- शहरातील विविध विकासकामांना प्रशासक श्रावण हर्डीकर यांची महापालिका सभेत मान्यता..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापालिका तसेच स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या महापालिका सभेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. मुख्य अभियंता–२ पदावर प्रमोद ओंभासे, तर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अर्चना गांधी, डॉ. पद्मजा हवालदार आणि डॉ. रोहित पाटील यांची पदोन्नती करण्यात आली. सह शहर अभियंता म्हणून प्रेरणा सिनकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी म्हणून अनिल कोल्हे, तसेच स्त्रीरोग प्रसुती तज्ञ म्हणून विशाल कराळे यांना पदोन्नती मिळाली. याशिवाय वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्ज्वला अंदुरकर आणि कार्यकारी अभियंता म्हणून योगेश अल्हाट, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, उमेश मोने आणि रविंद्र सुर्यवंशी यांच्या पदोन्नतीलाही सभेत मंजुरी देण्यात आली.
याशिवाय महापालिकेचे मौजे डुडूळगाव, गट. क्र. १९० पै (चऱ्होली फाटा ते डुडूळगाव) मधील प्रारूप विकास योजनेतील ३० मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी ९११४. ७४ चौ. मी. क्षेत्र वन विभागाकडून हस्तांतरीत करणे, सन २०२५-२६ अंदाजपत्रकातील पिंपरी चौक येथे माता रमाई पुतळा उभारणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणे या कामाच्या नावात बदल करणे व पिंपरी चौक येथे माता रमाई सृष्टीसाठी ब्राँज म्युरल्स व पुतळा उभारण्याचे काम करणे या कामाच्या नावाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यासाठी प्रशासक हर्डीकर यांनी मान्यता दिली. तसेच पिंपरी चिंचवड शहराकरीता सोर्स अपॉईंटमेंट, इमिशन इन्व्हेंटरी, कॅरींग कॅपेसीटी स्टडी करणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डीएनबी कोर्सेस सुरू असणाऱ्या रुग्णालयांतील डीएनबी शिक्षकांच्या मानधनास मान्यता देणे तसेच आदी विषयांना देखील प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी महापालिका सभेत मान्यता दिली.
स्थायी समिती सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने प्रारूप/अंतिम मतदार यादी तसेच मतदान केंद्रांची माहिती नागरिकांना ऑनलाईन वेब पोर्टलद्वारे सर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मनपाच्या सारथी हेल्पलाईनवर येणाऱ्या मतदान चौकशी माहितीकरिता लोकल सर्च (ऑफलाईन) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी येथील फेमस चौक एम के हॉटेल चौक मयुरीनगरी चौक व इतर ठिकाणी गणेशोत्सव व इतर वेळेस कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था यंत्रसामृगी, मनुष्यबळ पुरविणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणे आणि महापालिकेच्या रुग्णालयातील दंतरोग विभागाकरिता आवश्यक डेंटल साहित्य खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास प्रशासक हर्डीकर यांनी यावेळी मान्यता दिली.
याव्यतिरिक्त, तांत्रिक सेवा प्रदाता यांनी सुचविल्याप्रमाणे ग क्षेत्रीय कार्यालायांतर्गत जलनिस्सारण विषयक कामे करणे, पिंपरी चिंचवड महापालिकांतर्गत सन २०२४-२५ मध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना दिवाळीनिमित्त प्रोत्साहनपर भत्ता अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. विभागामार्फत बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विजमीटरचे सुरक्षा ठेव म.रा.वि.वि.कं. लि. यांस अदा करणेकामी आणि पिंपरी चिंचवड महापालिका समाजविकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करणेकामी येणाऱ्या खर्चास प्रशासक हर्डीकर यांनी मान्यता दिली. याशिवाय पिंपरी चिंचवड परिसरात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करणेकामी रेडिओ मोहीम राबविणे, इंद्रायची स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम अंतर्गत रिव्हर सायक्लॉथॉन उपक्रमाचे आयोजन करणे, आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साफसाफाई साहित्य खरेदी करणे, मुख्य अग्निशमन केंद्र, संत तुकाराम नगर येथील IPP-BX यंत्रणेसाठी व्हॉट्सऍप बिझनेस अकाऊंटचे नवीन कनेक्शन घेणे या विषयांना देखील सभेत मंजूरी देण्यात आली.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या कान, नाक व घसा विभागाच्या ऑपरेशन थिएटरसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी प्लाझ्मा सर्जिकल सिस्टीम विथ वॅन्ड्स उपकरण खरेदी करणे, महापालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे, अमेथिस्ट स्पोर्ट्स फाऊंडेशन, सेक्टर नं. १८, शिवाजी पार्क लिंक रोड, संभाजीनगर, चिंचवड, पुणे – १९ यांना महापालिकेचे स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथील बास्केटबॉल कोर्ट व स्केटिंग मैदान ११ महिने करारासाठी देण्यास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. तसेच नवी दिशा शुन्य कचरा झोपडपट्टी उपक्रमांतर्गत ह क्षेत्रीय कार्यालयाकडील महिला कर्मचारी व वैष्णवी महिला बचत गटाच्या महिला यांना कामकाज पाहणेकामी इंदौर येथे पाठविणे यासह विविध विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक हर्डीकर यांनी यावेळी मंजुरी दिली.


















