- प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रेरणादायी भाषण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि.१२ डिसेंबर २०२५) :- चिंचवड येथील कमला शैक्षणिक संकुलाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रतिभा सृजन व्याख्यानमाला सोहळ्यात समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात प्रभुणे यांनी “युवा वर्ग भारताचे भाग्य बदलू शकतो” असे आवाहन करत आपल्या कार्यातील संघर्ष, अनुभव आणि समाज upliftment संदर्भातील महत्त्वपूर्ण विचार मांडले.
प्रभुणे म्हणाले, “कानडी, कैकाडी, वडारी, डोंबारी, पारधी अशा भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही हा समाज कर्तृत्ववान असून जगण्याची धडपड करताना मोठे योगदान देतो. २०४७ पर्यंतचा कालावधी युवकांनी देशाला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी निर्णायक आहे. तरुणांनी कोलंबसासारखे नवीन मार्ग शोधले तर भारत जगात अग्रस्थानी पोहोचू शकतो.”
या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक डॉ. दीपक शहा, खजिनदार भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, लोकमतचे संपादक व व्याख्याते संजय आवटे, पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री प्रभुणे यांना पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी डॉ. दीपक शहा यांच्या दातृत्वपूर्ण कार्याचे कौतुक करत म्हटले, “शून्यातून निर्माण करण्याची ताकद म्हणजेच खरे नेतृत्व. समाजात बदल घडविणारे लोक असल्यामुळेच समाज पुढे जातो, त्यातील एक महान व्यक्ती म्हणजे प्रभुणे.”
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी संस्थेची २००६ पासूनची वाटचाल, आज ८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देत पुढील काळात दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन आणि उल्लेखनीय व्यक्तींना गौरविण्याची ग्वाही दिली.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना संजय आवटे यांनी युवा वर्गाशी संवाद साधत सांगितले, “यशस्वी व्हा, परंतु सर्वात महत्त्वाचे—हसतमुख व आनंदी राहा. जग बदलत आहे, भाषाही बदलत आहे; त्यामुळे सतत ज्ञान वाढवत राहा.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. रोहित अकोलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुवर्णा गोगटे, सन्मानपत्र वाचन डॉ. क्षितिजा गांधी यांनी, तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.


















