न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ डिसेंबर २०२५) :- केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सहकार्याने, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या डुडूळगाव येथील १ हजार १९० तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी किवळे येथे उभारण्यात आलेल्या ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबूक तसेच युट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय, खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूजित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सहकार्याने, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडूळगाव येथील १ हजार १९० व किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिकांसाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या प्राप्त अर्जांची छाणणी करून पात्र लाभार्थ्यांची संगणकीय सोडत सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे.

















