रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगार नेते व भारतीय कामगार सेना महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद व सामाजिक कार्यकर्ते हाजी दस्तगीर मनियार यांच्या मार्गदर्शनातून व प्रमुख उपस्थितीतून आज सोमवार (दि. ३) रोजी डांगे चौकातील अन्सार मस्जिद येथे सायंकाळी रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमास कामगार नेते इरफानभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मनियार, नगरसेवक संतोष बारणे, सचिन भोसले, विश्वजीत बारणे, वाकड पोलिस निरीक्षक सतीश माने, हरीश माने, गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक कांबळे, मौलाना अलीम अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभेत दुसऱ्यांदा पराक्रम गाजवून खासदार झालेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. तसेच समाजात सुख समाधान आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी इरफान सय्यद म्हणाले की, मुस्लीम बांधवांचा हा महत्वाचा सण असून, हा सण केवळ आनंदात साजरा केला जात नाही तर, समाजात एकोपा, बंधुभाव व समाज एकसंध तसेच अबाधित राहावा, यासाठी महिनाभर ईशवराकडे पार्थना केली जाते. जेणेकरून देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य व त्यांच्यातील संबंध आणखी घट्ट होण्यास मदत मिळेल. समाजाला एकता आणि शांतीचा संदेश देणारे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर धर्मांध शक्तींना आजिबात थारा नाही. समानतेची जाणीव निर्माण करून, आपापसांतील बंधुभाव वाढीस लागण्यास मुस्लिम बांधव कायम तत्पर असतात. ही सहिष्णुता आणखी वाढीस लागो, त्याकरीता माझ्या मुस्लिम बांधवाना पवित्र रमजानच्या शुभेच्छा.
कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अलीम अन्सारी यांनी केले होते.











