न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ४ जून २०१९) :- हिंजवडी परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून दिवसातील ४-५ तास सलग वीज गायब असते. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिसरातील मारुंजी, कासारसाई, नेरे, जांबे, कासारसाई गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज गायब होत असल्याचा फटका अनेक व्यावसायिकांना बसला आहे.
शासकीय कार्यालयातही अडचणी निर्माण होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातही विजेअभावी दस्तनोंदणी होत नाही. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे वेळेवर पूर्ण झाली नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. अनेक ठिकाणी विजेबाबतची कामे सुरू असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.











