- उत्पन्नाच्या नावाखाली बालउद्यानाचे व्यावसायिकीकरण..
- नागरिकांमध्ये तीव्र संतापचे वातावरण…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध उद्याने विकसित केली आहेत. त्यापैकी निगडी प्राधिकरण परिसरातील हिरवाईने नटलेली दुर्गा टेकडी आणि त्याठिकाणी उभारलेले ‘अप्पू घर’ हे शहरातील एक महत्त्वाचे आकर्षण मानले जाते. शुद्ध हवा, शांत वातावरण आणि सुरक्षित परिसरामुळे येथे दररोज सकाळ-संध्याकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते.
अप्पू घरमध्ये बालगोपाळांच्या मनोरंजनासाठी धडक गाडी, कोलंबससह विविध खेळणी बसवण्यात आली असून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांतील पालक आपल्या मुलांना येथे आवर्जून घेऊन येतात. अनेक शाळांच्या सहलीही नियमितपणे येथे दाखल होत असतात. मात्र, आता याच अप्पू घर परिसरातील काही भाग बंद करून ‘अप्पू घर लॉन्स’ या नावाखाली व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या नावाखाली सार्वजनिक उद्यानाचा असा वापर कोणाच्या हितासाठी केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर महापालिका प्रशासन स्वतःच आपल्या धोरणाला हरताळ फासून ठेकेदार व काही अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक जागांचे व्यावसायिकीकरण करत असेल, तर भविष्यात शहरातील इतर उद्यानेही अशाच प्रकारे खासगीकरणाच्या विळख्यात सापडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यामुळे नागरिकांसाठी असलेली मनोरंजनाची व पर्यावरणपूरक मोकळी जागा हळूहळू नाहीशी होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. अप्पू घर लॉन्स हा उपक्रम त्वरित बंद करण्यात यावा, तसेच सार्वजनिक उद्यानांचे मूळ स्वरूप कायम राखण्यात यावे, अशी जोरदार मागणी सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांकडून करण्यात येत आहे. या विषयावर माध्यमांनीही ठाम भूमिका घेऊन आवाज उठवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












