- प्रवेशावेळी आ. जगताप व शहराध्यक्ष काटेही उपस्थित..
- ‘छुपा पाठिंबा’ उघड झाल्याची चर्चा..
- कार्यकर्त्यांनी बंडखोरी करायची की पक्षशिस्त पाळून राहुल कलाटेंचा प्रचार करायचा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अखेर बहुचर्चित घडामोड घडली असून, सर्व विरोध झुगारून राहुल कलाटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, अनेक प्रश्नांना तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे राहुल कलाटेंच्या पक्षप्रवेशावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या दोन्ही प्रमुख नेत्यांची मंचावरची भूमिका आणि कलाटेंशी असलेली जवळीक पाहता, आतापर्यंत चर्चेत असलेला ‘छुपा पाठिंबा’ यानिमित्ताने उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राहुल कलाटेंच्या प्रवेशाला भाजपमधील काही निष्ठावंत आणि इच्छुक उमेदवारांचा तीव्र विरोध होता. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे नाराज इच्छुकांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता बंडखोरी करायची की पक्षशिस्त पाळून राहुल कलाटेंचा प्रचार करायचा? असा सवाल इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.
या घडामोडीनंतर भाजपमधील अंतर्गत समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे. काही इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना धक्का बसला असला, तरी नेतृत्वाने दिलेला संदेश स्पष्ट आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी निर्णायक ठरणार की अंतर्गत नाराजी वाढवणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.












