- विनोद नढे यांच्या प्रचाराला तरुणांसह जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
- ठिकठिकाणी होतेय भव्य स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २४ डिसेंबर २०२५) :- काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रभागातील विविध परिसर पिंजून काढत त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मंगळवारी सकाळपासून विनोद नढे यांनी कोपरा बैठका घेत नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि आगामी काळातील प्रभागाच्या विकासाचा आराखडा मांडत त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तसेच तरुण वर्गात नवचैतन्य संचारले असून, प्रचारात मोठा उत्साह दिसून येत आहे.
सायंकाळी विनोद नढे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोकणे नगर परिसरातील अयोध्या कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी १, २ व ३ येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटप केले. या दरम्यान ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले. कोकणे नगर येथील मृत्युंजय प्रतिष्ठान यांच्यावतीने विनोद नढे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच गणेश मंदिरात गणपतीची आरती करून प्रचाराचा समारोप करण्यात आला.
प्रचारादरम्यान अनेक महिलांनी विनोद नढे यांना आत्ताच विजयाच्या शुभेच्छा दिल्या असून, काळेवाडी प्रभागात भाजप उमेदवाराच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.












