न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयने केलेली १४ दिवस कोठडी वाढविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. रिमांडची कारणे सारखीच असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. कळसकर याच्याच जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आरोपींना प्रथम १ जून व नंतर ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
ही मुदत संपल्याने आज पुनाळेकर व भावे या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने आरोपींच्या कोठडीची मुदत १४ दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. मात्र, रिमांंडची कारणे तेच असल्याने ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.











