- कोपरा सभा, घराघरांत संवाद; विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ डिसेंबर २०२५) :- देशाचे नेतृत्व करणारे पं. नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद नढे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
निवडणूक प्रचारात नढे यांनी केवळ सभा न घेता थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. कोपरा सभा, घराघरांत भेटी, व्यापारी व नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वाहतूक कोंडी, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. “विकास हा घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विनोद नढे यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ राजकीय बदल नसून भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या अजेंड्यावर व सक्षम नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दर्शवतो, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. अनुभवी नेतृत्व, प्रशासनाचा अभ्यास आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यांच्या आधारे भविष्यातील शाश्वत विकासाचे नियोजन राबवले जाईल, असे नढे यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी प्रभाग २२ मधील नढेनगर परिसरातील पंचनाथ चौक, नंदादीप कॉलनी क्रमांक १ व २ तसेच पाटील हॉस्पिटल परिसरात जल्लोषात प्रचार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी प्रश्न, सूचना व अपेक्षा मांडत नढे यांना पाठिंबा दर्शविला. आगामी काळातही असा थेट संवाद सुरू ठेवत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार नढे यांनी व्यक्त केला.












