- मतदारांच्या ‘विजयी भव’ आशीर्वादामुळे यंदा प्रभागात परिवर्तनाच्या आशा बळावल्या..
- रहाटणीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – गणेश नखाते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २४ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणी परिसरात बुधवारी सायंकाळी विविध उमेदवारांनी प्रचार फेरी काढत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते गणेश नखाते यांच्या प्रचार फेरीने. काळेवाडी तापकीर नगर परिसरात नखाते यांच्या प्रचाराला नागरिकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रचार फेरीत ज्येष्ठ नागरिकांसह तरुण वर्गाचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. हातात झेंडे, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि नागरिकांचा थेट सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारले होते. घरोघरी महिलांनी गणेश नखाते यांचे औक्षण करत ‘विजयी भव’ असा आशीर्वाद दिला. हा आपुलकीचा प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह संचारल्याचे दिसून आले.
प्रचार फेरी पुढे निघून गेल्यानंतरही परिसरातील नागरिक नखाते यांनी आजवर केलेल्या कामांची स्तुती करताना दिसून आले. मूलभूत नागरी सुविधा, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्याने नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे गणेश नखाते यांच्याबाबत सकारात्मक चर्चा रंगताना पाहायला मिळाली. “यावेळी प्रभागात नक्कीच परिवर्तन घडेल,” असा विश्वास अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना गणेश नखाते म्हणाले, “नागरिकांनी दिलेला विश्वास आणि प्रेम हीच माझ्या कामाची खरी पावती आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, रहाटणीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.” नागरिकांच्या या विश्वासाच्या जोरावर आगामी निवडणुकीत नखाते यांची प्रचार मोहीम अधिक वेग घेणार असल्याचे चित्र आहे.












