- इच्छुकांच्या बेशिस्तपणामुळे शिस्तबद्ध पक्षाची प्रतिमा होतेय मलिन?..
- अधिकृत उमेदवारांची घोषणा पक्षाकडून अद्याप बाकी..
- तरीही, काही प्रभागांत स्वतंत्र पॅनल, प्रचाराचा शुभारंभ तर, थेट उमेदवारी अर्जही दाखल..
- पक्षश्रेष्ठी कारवाई करणार?…
मा. अशोक लोखंडे – संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 25 डिसेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच भाजपमध्ये सुरू झालेल्या हालचालींनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी पक्षधोरण आणि पक्षीय आचारसंहिता डावलत स्वबळावर हालचाली सुरू केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही. केंद्रीय व राज्य पातळीवरील चर्चेनंतर अंतिम उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात असतानाच, बहुतांश प्रभागांमध्ये काही इच्छुकांनी स्वतःचे पॅनल जाहीर करून थेट प्रचारफेरीला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्याचा धुमाकुळ सुरू आहे.
बॅनर्स, पोस्टर्स, सोशल मिडिया मोहिमा, घर-घर संपर्क अशा माध्यमांतून स्वतःला “अधिकृत उमेदवार” असल्याचा दावा करणारे काहीजण कार्यकर्त्यांचे जमाव गोळा करून ताकद दाखवत आहेत. त्यामुळे खरी अधिकृत घोषणा होईपर्यंत कार्यकर्ते आणि मतदार दोघांचाही संभ्रम वाढत चालला आहे.
यातील एका इच्छुकाने पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता थेट निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्जही सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजीचा सुर ऐकायला मिळत असून, पक्ष नेतृत्व अशा शिस्तभंगाकडे कोणत्या नजरेने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्ये आतापर्यंत “एकसंध नेतृत्व” आणि “निर्णयाची अंतिमता” ही ताकद मानली जात होती. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे पक्षात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. इच्छुकांच्या वाढत्या हालचालीमुळे तिकीट वाटपावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चाहूल राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
येत्या काही दिवसांत अधिकृत यादी जाहीर होताच परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वीच झालेल्या हालचालींमुळे भाजपमध्ये शिस्तभंगाचे वादळ उठले असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षश्रेष्ठी यावर कारवाई करणार काय? असा सुर पक्षातुनच दबक्या आवाजात सुरू झाला आहे.
या घडामोडीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शहर भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.












