न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) : पाणी ही दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे, याची आता आपल्या सर्वांना जाणीव व्हायला लागली आहे. जितके काटकसरीने आपण ते वापरू, तितके ते जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण, ते वापरत असतांना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर, त्यात निव्वळ आपलेच नव्हे तर समाजाचेही भले होणार आहे.
हवामानातील बदलांमुळे पावसाचे चक्र बदलले आहे. पाऊस वेळेवर पडत नाही आणि धरणातले पाणी आटते. यावर रामबाण उपाय म्हणजेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग बगिचा आणि अन्य कारणांसाठी व्हावा, यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा बसविण्याचे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले होते. मात्र, ते म्हणजे काय? याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक या sanklpnepasunअनभिज्ञ आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड भागातील वाढती लोकसंख्या, कमी होत चाललेली वृक्ष लागवड तसेच, वाढत असलेली सिमेंटची जंगले. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे व पाण्याचा भुजलसाठा कमी होत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे सर्वांना पाणी कपात, दुष्काळ या भिषण समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड भागातील पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater Harvesting) म्हणजेच ”पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे” ही योजना आमलात आणणे गरजेचे आहे.
पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater Harvesting) या योजनेबद्दल लोकांना माहिती नसल्याकारणास्तव ब-याच प्रमाणात दरवर्षी पावसाच्या पाण्याची नासाडी होत आहे. तरी, सदर योजना राबवल्यास पावसाच्या पाण्याची नासाडी टाळता येवू शकते. त्यामुळे एक सुजान नागरिक म्हणून पिंपरी-चिंचवड भागातील लोकांना पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater Harvesting) या योजनेची माहिती होण्याकरीता एक माहिती शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे.
जेणेकरून नागरिकांना भविष्याच्या दृष्टीने पाण्याची साठवण करण्याकरीता शिबीराद्वारे पावसाच्या पाण्याची साठवण कशी करावी? याची माहिती होईल आणि भविष्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. याची दक्षताही घेता येईल. तसेच दरवर्षी निर्माण होणारा पाणीप्रश्न लक्षात घेऊन, राज्य तसेच केंद्र सरकारनेही ही यंत्रणा बंधनकारक केली आहे. तरी मे. साहेबांना विनंती की, पिंपरी चिंचवड शहरातील परिसरात ‘पावसाच्या पाण्याची साठवण’ (Rainwater Harvesting) या योजनेची प्रभागनिहाय माहिती शिबीरे आयोजित करून, नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यामुळे शहरातील पाणीप्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागेल, असे कस्पटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.











