- अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांचा एकसंघ निर्धार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात बळकटी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी माजी विरोधी पक्षनेते माननीय नाना काटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या वेळी प्रभाग क्रमांक २७ मधील अनुभवी व ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते तसेच स्थानिक जनतेशी दीर्घकाळापासून थेट संपर्क असलेले अरुण चाबुकस्वार इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित होते. त्यांच्या राजकीय अनुभवामुळे, संघटन कौशल्यामुळे आणि भक्कम जनसंपर्कामुळे प्रभागात त्यांचे मजबूत स्थान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच दीपक जाधव हेही इच्छुक उमेदवार असून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
या बैठकीत पक्ष जो अधिकृत निर्णय घेईल, त्या उमेदवाराला सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने मदत करतील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पॅनल विजयी करण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी इच्छुक उमेदवार सुमित डोळस, निखिल काळे, विवेक कांबळे, छत्रभुज झाडे विशाल भालेराव ,माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, अमित भालेराव, संदीप पिसाळ, नितीन ओव्हाळ, युवराज प्रगणे,प्रमोद चाबुकस्वार यांच्यासह तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रसंगी माननीय नाना काटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “येणाऱ्या १६ तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल,”
असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होऊन नवउत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.












