- जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहामध्ये आवाज उठवण्याची क्षमता असलेल्या तरुण उमेदवारास पक्ष नक्कीच संधी देणार?…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २८ डिसेंबर २०२५) :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी, श्रीनगर, तापकीर नगर, जोतिबा नगर) येथे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असले तरी सध्या ‘स्थानिक उमेदवार’ हा मुद्दा मतदारांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.
प्रभाग २७ मधून संभाव्य उमेदवारी मागणारे बहुतेक प्रमुख चेहरे हे शेजारच्या प्रभाग २८ मधील रहिवासी असल्याने, “प्रतिनिधी आपल्याच प्रभागातील असावा” अशी भावना मतदारांमध्ये जोर धरू लागली आहे.
स्थानिक उमेदवाराचा मुद्दा पुढे..
विवेक सुभाष कांबळे हे प्रभाग २७ मधील प्रबळ स्थानिक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. स्थानिक समस्या, भौगोलिक परिस्थिती आणि जनमानस यांची त्यांना उत्तम जाण असल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. बाहेरील उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधताना मर्यादा येत असल्याची चर्चा असून, विवेक कांबळे उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेले असल्याने त्यांच्या बाजूने ‘पॉकेट व्होट’ असल्याचे निरीक्षक सांगत आहेत.
मागील पराभवातून धडा…
मागील निवडणुकीत बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने पराभव पत्करावा लागला — असा अनुभव कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. म्हणूनच, विजयाचे समीकरण साध्य करायचे असेल तर स्थानिक उमेदवारालाच संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा स्पष्ट संदेश…
“केवळ निवडणुकीपुरते दिसणारे उमेदवार नकोत; सुख-दुःखात सोबत राहणारा, आपल्या गल्लीत राहणारा प्रतिनिधी हवा,” असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. विवेक कांबळे यांच्या रूपाने स्थानिक, तरुण आणि सक्षम चेहरा पुढे आल्याने प्रभाग २७ मध्ये परिवर्तनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पक्षश्रेष्ठी स्थानिक अस्मितेचा विचार करतात का? याकडे लक्ष लागले आहे.












