- मुरब्बी नेतृत्व माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नीस उमेदवारी जाहीर..
- अनिताताई थोपटेंच्या रूपाने राजकीय समीकरणांना मिळालं अनपेक्षित वळण…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक काही दिवसांवर आल्याने आणि उमेदवारांना अर्ज सादर करण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना प्रभाग क्रमांक २७ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षितपणे निर्णय घेत माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या सुविद्य पत्नी अनिताताई कैलास थोपटे यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. उमेदवारी अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक असताना झालेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
रहाटणी–काळेवाडी परिसरात कैलास थोपटे हे अनुभवी नेतृत्व मानले जाते. दहा वर्षे त्यांनी प्रभागाचे प्रतिनिधित्व केले असून, विविध विकासकामांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली. मागील निवडणुकीत पराभव झाला असला, तरी नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास कायम असल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर थोपटे यांनी पत्नीचा नवा चेहरा पुढे करत वेगळी रणनीती अवलंबली आहे. महिला उमेदवार असल्याने महिला मतदारांपर्यंत अधिक परिणामकारक पोहोच, तर दुसरीकडे थोपटे यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्क या दोन्ही गोष्टींमुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढल्याचे पक्षातील सूत्रे सांगतात.
विरोधकांसाठी तयारीचा कालावधी कमी असताना घेतलेला हा निर्णय त्यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण करू शकतो, असे राजकीय वर्तुळातील निरीक्षकांचे मत आहे. एकूणच, अनिता थोपटे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग २७ मधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. हा डाव किती परिणामकारक ठरतो हे येत्या १६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.












