- दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवणार..
- सोमवारी इच्छुकांची यादी जाहीर होणार?…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रभाग क्रमांक १२ तळवडे मध्ये प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढविणार, अशी घोषणा केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये नव्या समीकरणांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीबाबत केलेल्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले असून दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसले.
खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकीनंतर दोन्ही बाजूंच्या चर्चांना आता आकार मिळत असल्याची चर्चा आहे. संयुक्त उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांचा भाजपवर निशाणा…
तळवडे येथील सभेत बोलताना अजित पवारांनी शहरातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनपातील खर्च, वाढलेल्या निविदा, जमिनींचे प्रश्न आणि काही प्रकल्पांतील बदल या मुद्द्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. “शहरावर कर्जाचा बोजा का वाढला, आणि ठरलेली कामे थांबली कशी?” असा सवाल करत त्यांनी महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष वेधले. पाणीपुरवठा आणि टँकर संदर्भातही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपचे ‘मिशन 125’ — विरोधकांकडून प्रत्युत्तर..
दुसरीकडे, भाजपने पिंपरी–चिंचवडमध्ये स्वबळावर 125 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. ‘अबकी बार 125 पार’ या घोषणेने पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी विरोधकांनी हा दावा अतिआत्मविश्वासाचा असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी “भाजप 125 जागा जिंकली तर मी राजकारण सोडेन,” — असे वक्तव्य करून राजकीय रंगत आणखी वाढवली.
पुढील दोन दिवस महत्त्वाचे..
दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकजुटीमुळे आणि भाजपच्या आक्रमक मोहिमेमुळे प्रभागनिहाय समीकरणे बदलू शकतात. संयुक्त यादी जाहीर होते का, आणि त्यावर भाजप कशी रणनीती आखते याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.












