- मोशीत सुसज्ज ‘एफडीए’ प्रयोगशाळेची निर्मिती प्रगतीपथावर…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- देशासह राज्यात वाढत चाललेल्या बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) नियंत्रणासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मनुष्यबळाची कमतरता आणि तपासणी प्रयोगशाळांची टंचाई यामुळे नमुन्यांचे अहवाल मिळण्यात विलंब होत असताना, पुणे जिल्ह्यातील मोशी येथे उभारली जात असलेली सुसज्ज प्रयोगशाळा दिलासादायक ठरणार आहे.
पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, मंजूर ४१ औषध निरीक्षकांच्या जागांपैकी केवळ ९ निरीक्षक कार्यरत आहेत. स्वतंत्र निरीक्षक नसल्याने पुण्यातील अधिकाऱ्यांनाच इतर जिल्ह्यांत कारवाईसाठी जावे लागते. तसेच अन्न व औषधांचे नमुने तपासणीसाठी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांकडे पाठवावे लागतात. त्यामुळे अहवालासाठी दोन महिन्यांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
मोशी प्रयोगशाळेसाठी २३ कोटी ५५ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता देऊन ३८ अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. राज्यातील सर्व एफडीए प्रयोगशाळांसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
नवीन प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर पुणे विभागातील नमुने स्थानिक पातळीवरच तपासले जाणार असल्याने नमुने पाठवणे, तपासणी आणि अहवालाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे अन्न व औषध भेसळविरोधी मोहीम अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
– गिरीश हुकरे, सहायक आयुक्त, एफडीए, पुणे विभाग…












