न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांच्या बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन भाजपने नवी कूटनीती आखली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघा अर्धा ते एक तास बाकी असताना पक्षाकडून अधिकृत उमेदवारांना बी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांनुसार अर्ज दाखल करतानाच बी फॉर्म जोडणे बंधनकारक नसले तरी, मुदत संपण्यापूर्वी तो देणे आवश्यक असते. बी फॉर्म ज्याच्या ताब्यात, त्यालाच पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि त्यामुळेच उमेदवारी मिळते. या योजनेमुळे उमेदवारांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असून, बंडखोरीची शक्यता कमी होईल, असा पक्षाचा विश्वास आहे.
महापालिकेतील अनेक प्रभागांत भाजपकडे एका जागेसाठी ७५ ते १०० इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाराजांकडून बंडखोरी किंवा इतर पक्षांकडे झुकाव होण्याचा धोका मोठा आहे. अंतिम यादी जाहीर करण्याबाबत स्थानिक नेतृत्व आग्रही असले तरी, यादी तत्काळ जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार आहे.
बी फॉर्म उशिरा देण्यामागे आणखी एक हेतू स्पष्ट केला जात आहे. तिकीट न मिळालेल्या “तगड्या” इच्छुकांना इतर पक्षांची ऑफर मिळू नये. त्यामुळे शेवटच्या क्षणीच अधिकृत उमेदवार निश्चित करून, बंडखोरीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.
दरम्यान, रविवारी आणि सोमवारी दुपारी चारपर्यंत महापालिकेसाठी अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. पुढील काही तासांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












