- प्रभाग क्रमांक २८ मधील पॅनेल बहुमताने विजयी करण्याचा निर्धार..
- विकासाचा ‘अजेंडा’ कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण – अनिताताई संदीप काटे…
- पॅनेलमधील सहकाऱ्यांच्या वतीने मतदारांवर कृतज्ञतेचा व सन्मानाचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३१ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणीमधील पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी पॅनेल प्रमुख आणि भाजपचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पॅनलमधील अन्य उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. प्रचाराला जोर आला असून ठीक-ठिकाणी उमेदवारांचे स्वागत करून ओवाळणी केली जात आहे.
भाजपाच्या अधिकृत पॅनेलमधून प्रभाग क्रमांक २८ मध्ये (अ) शत्रुघ्न (बापू) काटे, (ब) सौ. अनिताताई संदीप काटे, (क) सौ. कुंदा भिसे आणि (ड) संदेश काटे हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, प्रचाराला कमालीची धार आली आहे. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय तसेच महापालिकेतील सत्ताकाळात शहराच्या विकासासाठी राबवलेली भरीव कामे हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरत आहेत. या कामांचा लेखाजोखा थेट जनतेसमोर मांडत उमेदवारांनी घरोघरी जाऊन संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शत्रुघ्न काटे, अनिताताई काटे यांच्यासह अन्य उमेदवारांनी प्रभागवासीयांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
“वर्षानुवर्षांचा अनुभव, प्रामाणिक आणि पारदर्शक कार्यपद्धती तसेच नागरिकांशी निर्माण झालेली आपुलकीची नाळ हेच आमचे खरे भांडवल आहे. या बळावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत, त्यामुळे यंदाची निवडणूक लढताना स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण पॅनलचा विजय खेचून आणण्याचा संकल्प शत्रुघ्न काटे यांनी केला आहे. ”
तर, सौ. अनिताताई संदीप काटे यांनी “प्रभागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत विकासाची गती अधिक वाढवणार आहे. यासह आजवर स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ठोस व परिणामकारक केलेल्या कामांच्या बळावर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर-रहाटणीमध्ये संपूर्ण पॅनेल निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, असे अनिताताई यांनी सांगितले.”












