- पाच उमेदवारांचे एबी फॉर्म बाद..
- आता सर्वांना अपक्ष म्हणून लढावं लागणार; प्रचारयंत्रणेसमोर नवं आव्हान…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ दत्तनगर, पद्मजी पेपर मिलमध्ये उलटफेर झाला आहे. येथे भाजपच्या तीन आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आले आहेत. आता या प्रभागात कमळ चिन्हाचा एकच उमेदवार असेल, तर शिंदेसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील. चिन्हच गेल्यानं आता या पाचही उमेदवारांची कोंडी झाली आहे. त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
अर्जाची मुदत संपल्यानंतर उमेदवारांकडून एबी फॉर्म दाखल करण्यात आले होते. यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर छाननी झाली आणि फॉर्म बाद झाले, अशी माहिती समोर येत आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये आता प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागणार आहे. नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षांनी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता टिकवण्याचे आव्हान असताना घडलेल्या या घडामोडींमुळे राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












