- कॅमेरामन संजय गायकवाड यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०१ जानेवारी २०२६):- साधनांच्या, परिस्थितीच्या, वेळेच्या अडचणी बाजूला सारुन कॅमेरामन संजय गायकवाड यांनी माहिती व जनसंपर्क विभागाप्रती कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व आत्मियभाव ठेऊन सेवा दिली, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी काढले.
पुणे विभागीय माहिती कार्यालयातील दूरदर्शन कॅमेरामन संजय विठ्ठल गायकवाड हे २७ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मोघे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक सचिन गाढवे, कॅमेरामन संजय गायकवाड, संगीता गायकवाड, सत्यम गायकवाड तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय काम करत असताना वेगळेपण ही आपली ओळख असते. ती ओळख प्रत्येकाने जपणे गरजेचे असते. तशी वेगळी ओळख संजय गायकवाड यांनी जपली. त्यांनी सध्याच्या युगाला अनुरुप सृजनशीलता जपण्याचे काम केले. काही व्यक्ती सेवानिवृत्त होऊ नयेत असे वाटणे हेच त्यांच्या कारकिर्दीचे यश असते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या आदर्श घ्यावा अशी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जायचे, त्यांनी भावी आयुष्यात कुटूंबाला, स्वत:ची कला विकसित करण्याला वेळ द्यावा असेही डॉ. मोघे म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी पाटील म्हणाले की, संजय गायकवाड यांनी समर्पण भावनेने काम केले. शासकीय सेवा बजावत असताना त्यांच्या विनोद बुद्धीमुळे सहकाऱ्यांच्या कामाचा ताण हलका होत असे. समर्पित भावनेने काम करणारे व्यक्ती कार्यालयाचे आयकॉन ठरतात. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात खूप शिकण्याच्या संधी आहेत, तरी संजय गायकवाड यांनी या क्षेत्रातच पुढे कार्य करावे.
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, प्रत्येक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. शासन सेवेत काम करताना यश एकट्याचे नसते. प्रत्येक काम हे सांघिक भावनेने केल्यास यश नक्की मिळते असे गायकवाड म्हणाले.
यावेळी सचिन गाढवे, विलास कसबे व इतर कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी गायकवाड यांना निरोगी, निरामय दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.












