न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी प्रत्येक कक्षामध्ये सुरू असलेले कामकाज, कार्यपद्धती, नोंदवही व्यवस्थापन व प्रशासकीय रचना याची सविस्तर माहिती मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी घेतली.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता तथा निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा ईव्हीएम कक्ष प्रमुख प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, महापालिका उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा प्रसार माध्यम व संनियंत्रण समिती सदस्य-सचिव किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, हरविंदरसिंह बन्सल, मनोहर जावरानी तसेच विविध कक्षांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
आचारसंहिता कक्षाच्या पाहणीदरम्यान कक्षामार्फत प्राप्त होणाऱ्या तक्रारी, त्यांची नोंद, वर्गीकरण व त्यासंबंधी ठेवण्यात येणारी माहिती, तसेच कक्षामधील प्रशासकीय कामकाजाची सध्याची स्थिती याबाबत मुख्य निवडणूक निरीक्षक यांना माहिती देण्यात आली.
याशिवाय, प्रसार माध्यम व संनियंत्रण समिती कार्यालयाची पाहणी करताना माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूकसंबंधित बातम्या, जाहिराती, सोशल मीडिया तसेच डिजिटल माध्यमांवरील मजकुराचे निरीक्षण व नोंद कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती सादर करण्यात आली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे अभिरक्षा कक्षाची पाहणी करताना ईव्हीएम यंत्रांची साठवणूक व्यवस्था, सीलबंद स्थिती, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण प्रणाली तसेच संबंधित कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक साहित्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यातून पिंपरी येथे आणण्यात आले असून, ती अभिरक्षा कक्षामध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याशिवाय त्यांनी प्रस्तावित मतमोजणी कक्षाची पाहणी केली. यावेळी मतमोजणीसाठी प्रस्तावित जागा, कक्षांची मांडणी, प्रवेश व निर्गमन व्यवस्था, तसेच मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय तयारीबाबत माहिती घेण्यात आली. मतमोजणी कक्षामध्ये नियोजित असलेल्या विविध व्यवस्थांचा सध्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यानंतर मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू यांनी चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. आज नामनिर्देशन पत्रे भरण्याची अंतिम तारीख असल्याने या कार्यालयात सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती त्यांनी घेतली. उमेदवारांकडून स्वीकारण्यात येणारी नामनिर्देशन पत्रे, त्याची नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रकानुसार सुरू असलेले कामकाज तसेच कार्यालयातील व्यवस्थापन याबाबतची माहिती यावेळी सादर करण्यात आली.
दरम्यान, यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आकुर्डी प्राधिकरण येथील हेडगेवार भवन आणि थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती घेतली आणि प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याबाबत सूचना केल्या.
मतदान जनजागृती करणाऱ्या एलईडी व्हॅनचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्या हस्ते शुभारंभ.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात करण्यात आला. या एलईडी व्हॅनद्वारे मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया आदींबाबत माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात येणार असून त्यामधून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.












