- पक्षाच्या निष्ठावंतांवर अन्याय तर, आयात उमेदवारांना देखील फाट्यावर मारले?..
- भाजपला कार्यकर्त्यांची गरजच उरली नाही?..
- मग कुठल्या अदृश्यशक्तिच्या बळावर भाजप निवडणूकीला सामोरे जातोय?
- मतदारही बुचकळ्यात?…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केलेल्या तिकीट वाटपाचा मोठा उलटफेर आता पक्षालाच महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, अनेक ठिकाणी बाहेरून आणलेल्या आयात उमेदवारांचा प्रयोग स्वतःवरच उलटतो की काय? असे चित्र सध्या भाजपच्या गोटात दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून इतर पक्षातुन उमेदवारीचे प्रलोभन देत आयात केलेल्या इच्छुकांना देखील शेवटच्या टप्प्यात काही प्रभागात उमेदवारी न देता फाट्यावर मारल्याने त्यांचाही असंतोष शिगेला पोहोचला आहे.
वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्याग आणि मेहनतीची साधी दखलही तिकीटासाठी न घेतल्याने खरोखरच हा ‘केडरबेस’ पक्ष उरलाय का?, असा सवाल राजकीय वर्तुळातुन उपस्थित केला जात आहे.
“पक्षाला आता कार्यकर्त्यांची गरजच नाही का?” असा सरळ प्रश्न सभांमध्ये, कट्ट्यांवर आणि सोशल मीडियावर खुलेपणाने विचारला जात आहे. तिकीट वाटपातील या घोळामुळे अनेक प्रभागांत गोंधळ, बंडखोरीचे इशारे आणि गटबाजीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहताना दिसत आहेत.
दरम्यान, भाजप नेमक्या कोणत्या “अदृश्य शक्तीच्या” बळावर ही निवडणूक लढवणार आहे, असा प्रश्न मतदारांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांना दूर ठेवून आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून भाजपला निवडणूक जिंकणे शक्य होईल का? भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून तातडीने डॅमेज कंट्रोलची मोहीम सुरू न झाल्यास या उलटफेराचा थेट परिणाम येत्या 16 तारखेला मतदानाची टक्केवारी अथवा निकालावरही दिसून येऊ शकतो, अशी कुजबुज खासगीत सुरू आहे.












