न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशन येथे पथनाट्य सादरीकरण, फ्लॅश मॉब आणि स्वाक्षरी मोहीम राबवत दिव्यांग बांधवांसाठी मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी साईन लँग्वेजमध्ये मतदान शपथ घेण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशन येथे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, दिव्यांग मतदारांना महापालिकेकडून मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे.
उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत मतदानाच्या माध्यमातून पर्पल जल्लोष साजरा करावा. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. दिव्यांग बांधवांनी देखील येत्या १५ जानेवारी मतदानाचा हक्क बजावत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवावा, असे देखील ते म्हणाले.
दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांनी यावेळी प्रत्येक दिव्यांग बांधवांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी केले.
साईन लँग्वेजमध्ये मतदानाची शपथ.
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी साईन लँग्वेजमध्ये देखील या मतदान शपथेचे वाचन करण्यात आले.












