- काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये रविवारी भाजपचे शक्तीप्रदर्शन..
- प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी एकदिलाने मतदान करा – विनोद नढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०५ जानेवारी २०२६) :- “काळेवाडीचा विकास म्हणावा तसा झाला नाही; पण भाजपाच्या चारही उमेदवारांसोबत मी खंबीरपणे उभा आहे. सुसज्ज रस्ते, लाईट, पाणी, गार्डन अशी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करून दाखवणारच,” असा ठाम विश्वास चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. येत्या १५ तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे त्यांनी आवाहन केले.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २२ (काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर) येथे भाजपचे अधिकृत उमेदवार अ) पाडळे निता विलास, ब) कोमलताई सचिन काळे, क) विनोद जयवंत नढे आणि ड) हर्षद सुरेश नढे यांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. ०५) रोजी ‘सुपर संडे’चे निमित्त साधून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना संबोधित करताना आ. जगताप बोलत होते. यावेळी मोठा उत्साह दिसून आला. ज्योतिबा गार्डनमधून यात्रेला प्रारंभ झाला आणि ग्रामदैवत पंचनाथ महाराजांचे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण झाले. ठिकठिकाणी फुलांची उधळण, जल्लोष आणि घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले.
या मोहिमेत भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील प्रलंबित कामांना गती देण्याचा संकल्प केला. विशेषतः विनोद जयवंत नढे यांच्या पुढाकाराला तरुणाई आणि महिलांकडून मिळालेला वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरला. प्रभागाचा चेहरा बदलण्यासाठी एकदिलाने मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.












