- प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जानेवारी 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. “स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे, तर केवळ समाजासाठी काम करत आलोय,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले.
प्रभाग २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पॅनलतर्फे पिंपरी गावातील माळी आळी, कापसे आळी, पवनेश्वर मंदिर परिसर, कुंभारवाडा, खराडे वाडा, नानेकर चाळ, वाघेरे आळी, गव्हाणे आळी, सविता अपार्टमेंट आदी भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
कोरोना काळात स्वखर्चातून ७५ लाखांचे बेड, व्हेंटिलेटर व वैद्यकीय साहित्य जिजामाता रुग्णालयाला दिल्याचा उल्लेख करत वाघेरे म्हणाले, “वंचित घटकांसाठी काम केले, पिंपरी गावचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला अजून खूप काही करायचं आहे.”
पदयात्रेत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पॅनलमधील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.












