- प्रचारादरम्यान माझ्याप्रति नागरिकांच्या डोळ्यात आशा आणि विश्वास..
- प्रभागाला न्याय देण्याची इच्छाशक्ती केवळ माझ्याकडेच..
- भाजपा उमेदवार अनिताताई संदीप काटे यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०५ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मधून ‘ब’) भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे मैदानात आहेत. प्रचारसभेत त्यांनी “स्मार्ट पिंपळे सौदागरला स्मार्ट नगरसेविका हवी की घरात बसणारी?” हा मतदारांना केलेला सवाल सध्या चर्चेत आहे.
अनिताताई म्हणाल्या, “मी घरात बसणारी नाही. लोकांच्या न्याय, हक्क आणि अडचणींसाठी मी स्वतः पुढे येते. स्मार्ट पिंपळे सौदागर आणखी स्मार्ट करणे हा माझा संकल्प आहे. प्रचारादरम्यान नागरिकांच्या डोळ्यात आशा आणि विश्वास दिसत आहे. लोकांचे प्रश्न घरात बसून सुटत नाहीत. त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी माझी तयारी आहे.
मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ”आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरण या संकल्पांच्या आधारे प्रभागाच्या विकासाच व्हिजन भारतीय जनता पार्टीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीला पिंपळे सौदागर प्रभागात न्याय देण्याची इच्छाशक्ती माझ्याकडे आहे. त्या आधारावर आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरण या चार स्तंभांवर प्रभागाचा कायापालट करण्याचा मी निर्धार केला आहे.
“फक्त आश्वासनं नाही, थेट संवाद आणि जबाबदारी हीच माझी कामाची शैली आहे”. त्यामुळे फक्त चूल आणि मुल यातच धन्यता मानून घरात बसणारी नगरसेविका हवी की २४x७ नागरिकांच्या संपर्कात राहणारी सक्रीय नगरसेविका हवी? हे आता स्मार्ट आणि सुज्ञ पिंपळे सौदागरकरांनीच ठरवावे. कारण मतदारांपुढे मी माझ्या उमेदवारीचा पर्याय ठेवलेला आहे.












