- ज्येष्ठांचा अनुभव आणि आशीर्वाद पाठीशी असल्याने पाठबळ वाढले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. 05 जानेवारी 2026) :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलला विविध ज्येष्ठ नागरिक संघांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या निर्णयामुळे भाजप पॅनेलची ताकद वाढली असून प्रभागातील राजकीय वातावरणाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र आहे.
कस्पटे वस्ती, श्री गुरुदेव, पार्कस्ट्रीट, वेणुनगर आदी प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघांचा या पाठिंब्यात समावेश आहे. कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा आणि त्यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखीपणे घेण्यात आला.
बैठकीत प्रभाग क्रमांक २६ मधील उमेदवार ऍड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे व संदीप कस्पटे यांना सर्वानुमते पाठिंबा जाहीर करण्यात आला. अधिकृत निवेदनाद्वारे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
ज्येष्ठांनी गेल्या काही वर्षांत संघांच्या जडणघडणीत आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाजप पॅनेलच्या उमेदवारांनी दिलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. त्यामुळे हा पाठिंबा केवळ राजकीय नसून विकास, सामाजिक बांधिलकी आणि विश्वासार्ह नेतृत्वावरची शिक्कामोर्तब असल्याचेही बोलले जात आहे.
“आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना या सर्व उमेदवारांनी वेळोवेळी साथ दिली. त्यामुळेच आमचे संघ नावारूपास आले. त्यांचे योगदान विसरता येणार नाही; आमचे आशीर्वाद त्यांच्यासोबतच राहतील.”
— विठ्ठलराव अन्नदाते, कार्यकारी सदस्य, कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघ, वाकड












