- दोघेही पाॅवरफुल; पक्षश्रेष्ठींचीही नावांवर सहमती?..
- मात्र, निवड तर कोणा एकाचीच होणार..
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात हालचालींना वेग आला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपद भाजपकडेच जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी, हा मान भाजप नेमका कोणाला देणार यावरून पक्षांतर्गत राजकारण तापले आहे.
सध्या महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील दोन नावे प्रामुख्याने आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये पहिले नाव भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचे आहे. शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत निवडणूक यंत्रणा प्रभावीपणे राबवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने महापालिका निवडणुकीत ८५ जागांचा टप्पा गाठत मोठे यश मिळवले. या यशामागे आमदारांचे योगदान महत्त्वाचे असले, तरी नियोजन, उमेदवार निवड आणि प्रचाराची धुरा शहराध्यक्षांकडेच होती, असे पक्षातील अनेक नेते खासगीत मान्य करतात.
याशिवाय, पिंपळे सौदागर प्रभागात चारपैकी तीन जागांवर भाजपचा विजय होणे हे काटे यांच्या राजकीय ताकदीचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ‘यशस्वी शहराध्यक्षाला महापौरपद’ हा पर्याय पक्षासाठी योग्य ठरेल, अशी चर्चा भाजपच्या एका गटात सुरू आहे. यामुळे काटे यांचा दावा अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.
महापौरपदासाठी चर्चेत असलेले दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे नगरसेवक राहुल कलाटे. निवडणुकीआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांची राजकीय ताकद नाकारता येणार नाही. स्थानिक पातळीवर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांचे संबंधही चांगले असल्याचे सांगितले जाते. भाजप प्रदेश पातळीवरील नेत्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याची चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, चिंचवड मतदारसंघात सत्तासंतुलन राखण्यासाठी आणि काही प्रभावी स्थानिक नेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वरिष्ठ नेते राहुल कलाटे यांचा पर्याय वापरू शकतात. मात्र, त्याचवेळी पक्षातील काही प्रमुख नेत्यांचा विरोध पार करणे हे कलाटे यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
एकूणच, महापौरपदासाठी या नावांशिवाय इच्छुकांची संख्या मोठी असली तरीही, भाजप अनेकदा अनपेक्षित निर्णय घेऊन राजकीय वर्तुळाला धक्का देत असल्याचा इतिहास आहे. ऐनवेळी एखादे तिसरेच नाव पुढे आले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.














