न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पुण्यश्लोक अहल्यादेवी जयंती साजरी केली जाते. मात्र, पालिकेच्या निधीतून एका खासगी संस्थेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ५ वर्षांपासून केले जात आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षा भाजप नगरसेविका आहेत. याप्रकरणाची चौकशी करून, संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
याचे पडसाद आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. आशा शेंडगे यांनी महासभेत दत्ता साने यांच्यावर आरोप करताना त्यांच्या आईचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करीत, त्यांच्यावर चिखलफेक केली. राजकीय बाबीला व्यक्तिगत पातळीवर आणल्यामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने चांगलेच संतापले.
यावर दत्ता साने यांनी नगरसेविका शेंडगेंना लक्ष करीत ‘राजकारण गेलं खड्ड्यात, जन्मदात्या आईला उद्देशून बोलाल तर, याद राख” अशी तंबी दिली. तसेच यापुढे बोलताना माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले तर, ते खपवून घेतले जाणार नाही. बोलताना ताळतंत्र सोडून बोलू नये, अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा सज्जड इशारा दिला आहे.














