- अनुभवी नगरसेवकांना डावलले..
- प्रथमच निवडून आलेल्या पुत्राच्या गळ्यात घातली गटनेतेपदाची माळ….
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेता निवडीवरून पक्षात खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्रप्रेम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले असून, त्यामध्ये पक्षात ‘शिवसेनेची वाघीण’ म्हणून ओळख असलेल्या पक्षाच्या उपनेत्या व अनुभवी नगरसेविका सुलभा उबाळे, तसेच नगरसेवक पदाचा अनुभव असलेले निलेश बारणे यांच्यासारखे दिग्गज असतानाही, कोणताही पूर्वानुभव नसलेले आणि नुकतेच प्रथमच नगरसेवक झालेले विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
गटनेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत खा. श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर उपस्थित होते. मात्र, ही निवड आधीच ठरवून आणल्याचा आरोप शिवसैनिकांकडून खासगीत होत आहे. बैठक ही केवळ औपचारिकता ठरली असून, निर्णय आधीच ‘वरून’ झाला होता, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी झटलेल्या नगरसेवकांना डावलून केवळ घराणेशाहीच्या जोरावर पदं वाटली जात असतील, तर पक्ष कसा वाढणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या निर्णयामुळे शिवसेनेत घराणेशाहीला खतपाणी घातले जात असल्याची भावना बळावत असून, “संघटना की कुटुंब?” असा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. हे पुत्रप्रेम भविष्यात पक्षाच्या एकतेला आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलाला तडा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















