- गेली दहा दिवस मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला हरिनामाचा अखंड जयघोष…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३१ जानेवारी २०२६) :- रोज पहाटेचा काकडा, विठ्ठल-रखुमाई, संत तुकोबारायांचा अभिषेक व महापूजा, हरिपाठ, दोन स्वतंत्र मंडपात ज्ञानेश्वरी व गाथा पारायण, सकाळी ११ ते दुपारी १ पर्यत पुणे जिल्ह्यातील विविध युवा कीर्तनकरांची कीर्तनसेवा, सायंकाळी ४ ते ६ या कालावधी वारकरीरत्न, हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुमधुर, रसाळ वाणीतून विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा, सायंकाळी ६ ते ८ या काळात वारकरी परंपरेतील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनसेवा, रात्रीचा जागर असा अखंड हरिनामाचा जागर मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला संपन्न झाला.
पारायणाची सांगता झाल्यानंतर मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागातून ज्ञानेश्वरी व गाथा पारायणामध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविक पुरुष व महिला वाचकांनी आपापल्या डोक्यावर ज्ञानेश्वरी व गाथा घेऊन श्री विठ्ठल-रुखमाई, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांचा पादुकांना प्रदक्षिणा घालून मैदानाच्या मध्यभागी उभारलेल्या वारकरी संप्रदायाच्या ध्वजस्तंभाच्या भोवती रिंगण करीत ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा जयघोष केला. प्रत्येक वाचक भाविकाच्या चेहऱ्यावर पारायण पूर्ण केल्याचे समाधान झळकत होते. या रिंगण सोहळ्यात महिला भाविकांनी फुगड्या खेळल्या तर पुरुष वाचक भाविकांनी एकमेकांची गळाभेट घेत या भंडारा डोंगर दशमी सोहळ्यात पुढील वर्षी देखील पारायण करण्याचे भाग्य लाभो, असा तुकोबारायांच्या चरणी संकल्प सोडला.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्य वर्षानिमित्ताने वारकरीरत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडार डोंगर ट्रस्टने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला आयोजित केलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सव’ या सोहळ्यात दहाव्या दिवसाची, काल्याची कीर्तनसेवा स्वतः हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी केली.
काल्याच्या कीर्तन प्रसंगी हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥
माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥ तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥
या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करीत अनेकांच्या संगतीत आमची खूप फजिती झाली. परंतु भगवंता तुझ्या संगतीत आल्यानंतर मात्र आमच्या आयुष्याचे कोटकल्याण झाले असा सर्व गोपाळांनी साक्षात भगवंत श्री कृष्णाशी साधलेला संवांद अनेक अभंग व दृष्टांत देत सांगितला.
काल्याच्या कीर्तन प्रसंगी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काशिद यांनी नुकतेच आकस्मित दु:खद निधन पावलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मावळच्या माजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांना उपस्थित सर्व भाविकांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या वीस वर्षांपूर्वी या परिसरातील माझ्या सर्व सहकार्यांसह पाहिलेले तुकोबारायांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्याचे स्वप्न मराठवाडा, विदर्भातील गोरगरीब भाविक वारकरी व हजारो दानशूर दाते यांच्या आर्थिक सहकार्यातून साकार होत आहे व येत्या वर्षभरात हे मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास जाईल आणि देशाचे पंतप्रधान मा.मोदी साहेब, देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व साधू संत, वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराचा लोकापर्ण सोहळा पाच लाख भाविकांच्या साक्षीने होईल अशी ग्वाही श्री बाळासाहेब काशिद यांनी दिली.
या अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या सर्व भाविकांचे, वाचकांचे व महाप्रसादासाठी देणगी देणा-या सर्व दानशूर दात्यांचे काशिद यांनी आभार मानले. या सोहळ्यात सहभागी होत सहकार्य करणारे संत तुकाराम महाराज संस्थान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, दिंडी सोहळ्यासाठी रथ देणारे श्री जगनाडे महाराज संस्थान, देवगड संस्थान आदीचे काशिद यांनी विशेष आभार मानले.
तसेच माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित होत असलेल्या या अखंड हरीनाम सोहळ्यासाठी आकर्षक अशी मंडप व्यवस्था करणारे नेवाळे मंडपचे मालक श्री महादू नेवाळे, महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे पूर्ण काम व नियोजन करणारे श्री महेंद्र होनावळे, पंगती मधून महाप्रसादाचे वाटप करणारे श्री क्षेत्र आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळ, इंदुरी येथील ठाकर वस्ती, खांडी, बोरवली, कुसूर या गावातील स्वयंसेवक, संतोषी माता मित्र मंडळ तसेच या सोहळ्यात २ लाख पुरणपोळी देणारे मुळशी तालुक्यातील ग्रामस्थ, भाकरी पोहोच करणारे पुणे जिल्हयातील अनेक गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी यासर्वांचे काशिद यांनी आभार व्यक्त केले.












