- लघुउद्योगांना दिलासा देणारा बजेट जाहीर व्हावा : संदीप बेलसरे…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जानेवारी २०२६) :- येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशातील तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधारकांचे लक्ष लागून राहिले आहे. वाढती महागाई, कच्च्या मालाचे दर, करप्रणालीतील गुंतागुंत आणि कर्जपुरवठ्यातील अडचणी यामुळे एमएसएमई क्षेत्र अडचणीत सापडले असून, या पार्श्वभूमीवर उद्योगस्नेही बजेट सादर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी येणाऱ्या बजेटमध्ये उद्योजकांसाठी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यांनी सांगितले की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट अंतर्गत कर्ज मर्यादा वाढवावी, जेणेकरून लघुउद्योगांना भांडवली अडचणींवर मात करता येईल.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) संदर्भातही सुधारणा गरजेची असल्याचे बेलसरे यांनी नमूद केले. जीएसटी नोंदणी व रद्द करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि ऑनलाईन स्वरूपात जलद करावी. तसेच भाडेतत्त्वावरील औद्योगिक जागांवर जागेशी निगडित म्हणून आकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी रद्द करून त्याबाबत स्वतंत्र व व्यवहार्य धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय वस्तू व सेवा कर कायद्यात पुनरावलोकनाची स्पष्ट तरतूद असावी, जेणेकरून उद्योजकांना चुकीच्या करआकारणीपासून दिलासा मिळू शकेल. इन्कम टॅक्समधील करमुक्त मर्यादा वाढवून करप्रणाली अधिक सुटसुटीत करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष सवलती जाहीर कराव्यात, तसेच नव्या यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पूर्वी बंद करण्यात आलेली अनुदान योजना पुन्हा सुरू करून किमान १५ टक्के अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी बेलसरे यांनी केली.
जर येणाऱ्या अर्थसंकल्पात या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला, तर उद्योगांना नवसंजीवनी मिळेल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने व्यक्त केला आहे.












