- पाच चुका झाल्यास नोंदणी रद्द होणार..
- बेशिस्त वाहनचालक वाहतूक विभागाच्या रडारवर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ फेब्रुवारी २०२६) :- रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात महत्त्वाचे बदल करत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नव्या नियमानुसार, एका वर्षात वाहतूक नियमांचे पाच वेळा उल्लंघन करणाऱ्या चालकाचा परवाना निलंबित अथवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे यांसारख्या सामान्य उल्लंघनांनाही गंभीर स्वरूपात घेतले जाणार आहे. अशा २४ प्रकारच्या उल्लंघनांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी कोणत्याही पाच चुका झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ई-चलन प्रणालीद्वारे उल्लंघनाची नोंद झाल्यानंतर वाहनचालकाला दंड भरण्यासाठी अथवा अपील करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. या मुदतीत चालकाने प्रतिसाद दिला नाही तर उल्लंघन निश्चित मानले जाईल आणि पुढील कारवाईस सुरुवात होईल. पाच उल्लंघनांनंतर कारवाई करण्यापूर्वी चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अपील करण्याचीही सुविधा उपलब्ध असेल.
“नव्या नियमांमुळे रस्त्यावरील शिस्त वाढण्यास मदत होईल. वाहतूक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असून चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कठोर कारवाई टाळता येणार नाही.”
-राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…












