सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ फेब्रुवारी २०२६) :- भोसरी परिसरात बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रणय सुनील खेडे (वय १७, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या बारावीमध्ये शिक्षण घेत होता.
महाविद्यालयातील काही प्रकल्प अपूर्ण राहिल्यामुळे तसेच प्रात्यक्षिक परीक्षेला बसता आले नसल्यामुळे तो काही दिवसांपासून तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी प्रणय आयडीसाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतला.
घटनेच्या वेळी त्याची आई बँकेत कामावर गेली होती, तर वडील गावाला गेले होते. घरात एकटाच असताना प्रणयने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी पोलिसांना दिली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण, पालकांच्या अपेक्षा आणि संवादाचा अभाव या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ताण जाणवत असल्यास त्यांनी पालक, शिक्षक किंवा समुपदेशकांशी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला…
विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा परीक्षेमुळे तणाव जाणवत असल्यास पालकांनी त्यांच्या मानसिक स्थितीची दखल घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.












