- विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्णपदके..
- शाळेला मिळाला उत्कृष्ट कामगिरीचा चषक…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- निगडी येथील मॉडर्न हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार योगा स्पर्धेत पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली.
इयत्ता सहावीतील शिवराज काटे व अनिका खेडेकर तसेच इयत्ता सातवीतील अंशी दुबे आणि त्रिशा धावणे यांनी आपल्या सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे शाळेचा मान उंचावला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे योगा प्रशिक्षिका प्रीती मुकाती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या समर्पित प्रयत्नांची दखल घेत त्यांनाही सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली.
या यशात आणखी भर घालत चॅलेंजर पब्लिक स्कूलला जिल्हास्तरीय उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचा चषक (ट्रॉफी) प्रदान करण्यात आला. शाळेचे चेअरमन संदीप काटे यांच्या सक्षम नेतृत्व व सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानण्यात आले.












