संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- ‘स्वच्छता हीच सेवा’ हा मूलमंत्र देऊन समाजात स्वच्छतेचा जागर करणारे महान समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. २३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. हातात झाडू घेऊन केवळ परिसरच नव्हे, तर समाजमनातील अज्ञान व अंधश्रद्धेचा कचरा दूर करणाऱ्या या महान संताच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“संत गाडगेबाबांचे विचार केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून, ते समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहेत. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पुणे महानगर प्रदेश घडवण्यासाठी प्राधिकरण सदैव तत्पर आहे,” असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.











