न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१६ एप्रिल २०२६) :- अनुसूचित जातींमधील अति-वंचित ५९ जातींना न्याय मिळेपर्यंत राज्यात कोणतीही मेगा भरती करू नये, अशी ठाम भूमिका साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे आणि आमदार अमित गोरखे यांनी मांडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन साठे यांनी सांगितले की, मातंग समाजासह अनेक जाती आजही आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. उपवर्गीकरणाशिवाय समान न्याय मिळणार नाही, त्यामुळे समाजाने अधिक संघटित होण्याची गरज आहे. त्यांनी ई-मेल मोहीम, निवेदने आणि लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवण्याचे आवाहन केले.
आमदार अमित गोरखे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत उपवर्गीकरण हेच समानतेचे खरे साधन असल्याचे म्हटले. अति-वंचित घटकांना शिक्षण व नोकरीत संधी मिळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यभर दौरा करून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.










