- विजेच्या लपंडावाने लघु-उद्योजक त्रस्त
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. ७) रोजी झालेल्या पहिल्याच पावसाच्या झटक्यात अनेक ठिकाणी जुने फीडर खराब झाल्यामुळे, वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक कंपन्या रात्री दोन वाजेपर्यंत बंद होत्या. तसेच, कामगार वर्गही बसून होता. महावितरणाच्या कामचुकारपणामुळे उद्योजकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने महावितरणाचे भोसरी परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश तालेवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी फोरमचे अध्यक्ष अभय भोर, उद्योजक मोहन बागमार, रोहित पुराणिक, स्वप्नील बरगुडे, कार्तिक गोवर्धन व उद्योजक आदी उपस्थित होते.
यात म्हटले आहे की, महावितरणाचे बहुतेक कंडक्टर खराब झाले आहेत व फीडरही जुनाट झाले आहेत. त्यामुळे ते वारंवार खराब होतात. तसेच, कमी केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिन्या टाकल्यास त्या लोड घेत नाहीत. याबाबत फोरमच्या वतीने महावितरणाचे मुख्य अभियंता राजेश तलवार यांना तीन ते चार महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आले होते व त्यांनी मार्च महिन्यांपर्यंत फीडर व कंडक्टर नवीन बसविण्यात येतील, असे आश्वासनही दिले होते. परंतु, अद्याप त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.
मोठ्या उद्योजकांकडे जनरेटर असतात. परंतु, लहान उद्योगांवर विजेचा मोठा परिणाम जाणवतो. जुनाट फिडर, नादुरूस्त कंडक्टर लाइनचा अभाव, सततचे खोदकाम यामुळे मोठ्या समस्येला उद्योजकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महावितरणाला हे शेवटचे निवेदन असून, याउपरही कार्यवाही झाली नाही तर मात्र, महावितरणाला उद्योजकांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून, या खात्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्योजकांच्या वतीने मंत्रालयात घेराव घालण्यात येईल, असा इशारा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


















