न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- घंटागाडी चालक दत्तात्रय गायकवाड यांची थ्री व्हीलर रिक्षा क्रमांक (एम एच १४ / ईएम ७३७५) ही चाकण नगरपरिषदेला कचरा गोळा करण्यासाठी भाडे तत्वाने लावली असून ही रिक्षा वॉर्ड क्रमांक १८ मध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते.
शुक्रवारी ७ जूनला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांनी चाकण शहरातील माळआळी, सिकीलकर हॉस्पिटल, चाकण बाजारपेठ इत्यादी ठिकाणाहून कचरा गोळा करून बिरदवडी जवळील खराबवाडीच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडवर कचरा खाली केला. यावेळी येथील सुरक्षारक्षक अनिल लेंडघर ( रा. राणूबाईमळा, चाकण ) यांनी गायकवाड यांना सांगितले कि, सदर गाडी खाली करीत असताना गाडीतील कचऱ्यातील पिशवी चाळत असताना भंगार गोळा करणाऱ्या महिलेस एका माणूस जातीच्या हाताचा तुटलेला पंजा, एका बाजूस रक्ताळलेला व सुरकुतलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.
घंटागाडी चालक दत्तात्रय मुकुंद गायकवाड ( वय ३१, रा. वाकी बुद्रुक, ता.खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कचरा तपासणीच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच परिसरातील खासगी रुग्णालयातून हा पंजा कचऱ्यात आला की काय याचाही तपास पोलीस घेत आहेत.















