- भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का देण्याची निसर्गंध यांच्यात ताकद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरने ”आमचीही दखल घ्यावी लागेल” असा सज्जड इशाराच सत्ताधारी व विरोधकांना आपल्या कामगीरीने दिला. राज्यभरात वंचीतने ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या माध्यमातून मोठे रान पेटवून दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघातही वंचितने सत्ताधारी महायुतीला व राष्ट्रवादीच्या उमेदवारालाही पळता भुई थोडी केली.
शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोलाचा सहभाग यात होता. त्यात बहूजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांची कामगीरीही उल्लेखनीय होती. भोसरी मतदारसंघातुन महायुतीचे व विजयी उमेदवाराचे मताधिक्य घटण्यास निसर्गंध यांचा मोठा वाटा आहे. याची दखल घेत, शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार राहूल ओव्हाळ यांनी सर्वोसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे निसर्गंध यांची आगामी भोसरी विधानसभेसाठी शिफारस केल्याचे समजते.
भोसरी विधानसभा मतदारसंघात मागासवर्गीय, मुस्लिम, ओबीसी समाज बहूसंख्य आहे. या समाजाच्या हक्कांबाबत मी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने विकासकामांपासुन पळ काढत, या मतदारसंघात गेली पाच वर्षे स्वःचे ब्रँडिंग करण्यावर भर दिला. तमाम यूवावर्ग, ज्येष्ठ-महिलावर्ग, लघु-उद्योजक यांना विकासाचे दिवास्वप्न दाखविले. जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने परिवर्तन करण्याचे ठरविले असून, ते वंचित आघाडीच्या पाठी ठाम राहणार असल्याचे निसर्गंध यांनी यावेळी सांगीतले.














