न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. आता विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०१९ मध्ये संपणार आहे. मागील २०१४ प्रमाणेच यंदाही सप्टेंबर महिन्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता जेमतेम तीन-चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांनी “फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच ढीगभर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून, प्रसंगी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारी देखील केली असली तरी, या मतदारसंघात मी ताकतीनं काम केले आहे, या मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावरच पिंपरीतील जनता मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी व्यक्त केला.
न्यूज पीसीएमसीशी खास बातचीत समयी ते बोलत होते. ननावरे म्हणाले की, मी या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभागात मागील गेली दोन टर्म पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. जनतेनं माझ्या कार्याची पोचपावती देत, दोन वेळा काम करण्याची संधीही मला दिली. नगरसेवकपदाच्या कार्यकाळातच जनतेच्या आशीर्वादामुळेच माझ्यातील एक युवा नेतृत्व उभारत गेले. या माध्यमातूनच मतदारसंघातील प्रभागात अनेक कामे महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावली. त्यामुळे जनमानसात माझी विकासाबाबत एक वेगळीच प्रतिमा तयार झालेली आहे.
नैतिक बाबींवर एकमत होत नसल्याने मी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत, जनतेच्या आग्रहाखातर त्यांच्या प्रश्नांबाबत आग्रही राहत, शिवसेनेत प्रवेश केला. येथेही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्याकामी झटलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये खा. श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून बूथ लेवलवर कार्यकर्त्यांना नवंसंजीवनी देण्याचे काम केले. पक्ष संघटन मजबूत केले. या मतदारसंघातील युवावर्ग शिवसेनेशी जोडण्याचे काम मी पक्षाच्या माध्यमातून करीत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे खा. बारणे यांना मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य होय. या सर्व बाबींच्या आधारावर पक्षनेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाचा विचार करण्यास सकारात्मक आहे.
भाजपाचा मित्रपक्ष आरपीआय (आठवले गट) या जागेवर आपला हक्क सांगत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ही जागा आरपीआयला देऊ केली होती. रामदास आठवले पुन्हा या जागेवर आपल्या पक्षाचा अधिकार सांगत आहेत, असे असताना देखील भाजपाच्या नेत्यांना मात्र, ही जागा आपल्या पदरात पडेल, अशी आशा वाटते. परंतु, या जागेवर विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा मित्रपक्षांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे खात्रीलायक माहिती आहे.
पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून खा. बारणे यांना दिलेल्या मताधिक्याचा दावाही ननावरे यांनी खोडून काढून काढला. विधानसभेला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, चाबुकस्वार हे स्वतःचे घर व संपर्क कार्यालय वगळता, इतरत्र फिरकलेच नाहीत. ज्यांना आगामी विधानसभेला निवडून येण्याचा आत्मविश्वास व खात्रीही नाही, असे आमदार या मतदारसंघातून खा. बारणे यांना कुठून मताधिक्क्य देणार? बारणे यांना यशस्वी करण्यासाठी पिंपरी विधानसभेतून शिवसेनेच्या वतीने आम्ही व महायुतीतील भाजप, आरपीआय यांनी प्रचंड मेहनत घेतली. माझ्या व शिवसेना कार्यकर्त्यांच्या संघटन बांधणीमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद भाजप व आरपीआयपेक्षा कैक पटीने वाढलेली आहे. त्यामुळे चाबुकस्वार हे एकटे या विजयाचे श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीलोलुपता दाखवत आहेत.
या मतदारसंघात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर नवीन हौसे-गवसेंचे तनरूपी पिक वर आलेले आहे. या मतदारसंघाचा व त्यांचा काडीचाही संबंध नसताना. तसेच गेली पाच वर्षे कोणतेही कामं न करता अचानक “आमचं ठरलयं, आमचं आधीच ठरलयं, आमचं तुमच्याही आधी ठरलयं” अशा तकलादू वल्गना करीत, केवळ मतदारांवर अनावश्यक प्रभाव टाकण्याचे व षड्यंत्र रचण्याचे काम हा नवखा इच्छुक वर्ग करीत आहे. परंतु, या मतदारसंघातील मतदार सुज्ञ असून, त्यांना आपलं कोण? हे नक्कीचं कळतं. त्यामुळे त्यांनी आपली सोय इतरत्र करावी. या मतदारसंघात माझ्या विकासकामांमुळे व पक्षीय संघटनबांधणीमुळेच शिवसेनेकडून मी अधिकृत उमेदवार असणार आहे, व निवडूनही येणार आहे, असा दावाही जितेंद्र ननावरे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना केला.















