न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १७ मार्च २०२६) :- निगडी येथील भक्ती शक्ती चौक परिसरातील व्हिजन प्लस मॉलमधील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत अनैतिक मानवी व्यापाराचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सायंकाळी ७.३३ वाजण्याच्या सुमारास व्हिजन प्लस मॉलमधील “ब्लु बिल्स स्पा” येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी अमोल खंडु जाधव (वय ४०) याने स्पा सेंटरच्या आडून दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता हा प्रकार उघड झाला. आरोपी महिलांकडून मिळणाऱ्या पैशावर स्वतःची उपजीविका करत असल्याचे तपासात समोर आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार भगवंता मुठे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.












