- डॉ. बाबा कांबळे यांची चौकशीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० मार्च २०२६) :- पुण्यातील ‘पिंक रिक्षा’ योजनेत सुमारे ४०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप करत तातडीने चौकशीची मागणी केली.
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत १० हजार महिलांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा देऊन लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. टेंडरमधील अटी धाब्यावर बसवून कमी क्षमतेच्या बॅटऱ्या, कमी रेंज आणि अपुरी सुरक्षा असलेली वाहने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच ‘ऑटो रिक्षा’ऐवजी कमी क्षमतेच्या ई-रिक्षा देण्यात आल्यामुळे महिलांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. अनेक वाहनांना RTO नोंदणीही मिळालेली नाही. पीडित महिलांनी संताप व्यक्त करत शासनाने १५ दिवसांत तांत्रिक ऑडिट करून योग्य कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.








