- मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० मार्च २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग देण्यात आला असून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
या मार्गिकेचे सुमारे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही जलद गतीने सुरू आहे. मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान त्यांनी कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची स्थिती तपासून कंत्राटदारांना आवश्यक सूचना दिल्या.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवास कमी वेळात पूर्ण होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा २३.२ किलोमीटरचा उन्नत मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारला जात असून प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ८,३१३ कोटी रुपये आहे.








