- महिला सक्षमीकरणाचा आकुर्डी पॅटर्न राज्यासाठी ठरणार आदर्श – आ. अमित गोरखे…
मा. अशोक लोखंडे :- संपादक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या ‘सखी आंगण’ या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत विशेष कौतुक केले आहे.
या उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार अमित गोरखे यांना शुभेच्छा पत्र पाठवले असून, हे पत्र आमदार गोरखे यांनी नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना भेटून सुपूर्द केले.
या भेटीदरम्यान शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक शिस्त, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. ‘सखी आंगण’ अंतर्गत ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ४९ गाळ्यांचे वाटप महिला बचत गटांना करण्यात आले आहे. येथे खाद्यपदार्थ, हस्तकला व घरगुती वस्तूंच्या विक्रीसाठी सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महिलांना थेट व्यवसायाची संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. तसेच, प्रकल्पात विद्यार्थ्यांचे डिझायनिंग व मार्केटिंग योगदान आणि गोंडी चित्रकलेमुळे सांस्कृतिक मूल्यही जपले गेले आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


















