- ‘स्पा’ आड सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांची धडक मोहीम..
- कारवाईत सातत्य हवं; तरच मोहीम फत्ते होईल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्पा आणि वेलनेस सेंटर’च्या आडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांवर पोलिसांनी नुकताच कारवाईचा वेग वाढवला आहे. आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडत या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली.
सभागृहात बोलताना गोरखे यांनी काही ठिकाणी स्पा व्यवसायाच्या आडून गैरप्रकार सुरू असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कडक नियमावलीची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढील काही महिन्यांत स्वतंत्र नियम लागू करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पोलिसांनीही कारवाईची तीव्रता वाढवत धडक मोहिमा सुरू केल्या आहेत. काल (दि. २५) संत तुकाराम नगर परिसरातील एका स्पावर छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यावर्षी आतापर्यंत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ८ आस्थापनांवर कारवाई करत २० आरोपींना अटक केली असून १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच मागील तीन वर्षांत २९ आस्थापनांना बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आगामी काळातही कारवाई अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
















