- कार्यकाळातील वादग्रस्त कारभारावर थेट सवाल..
- कनिष्ठ अभियंता प्रकरण आणि बनावट कागदपत्र…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णयांवर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राज्याच्या विधानभवनात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नगरसेवकांनी वारंवार चौकशीची मागणी करूनही त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी का करण्यात आली नाही?, असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
अहिर यांनी सांगितले की, ‘जानेवारी महिन्यात निकम यांनी निवृत्ती घेतली असली तरी, त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. कनिष्ठ अभियंता आणि बनावट शासकीय कागदपत्रांच्या आधारे कामे केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
विशेषतः अमोल पडवळकर या कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून सध्या त्यांची लातूर येथे बदली झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून निकम यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात लावून धरली.
माजी नगरसेवकाच मुख्यमंत्र्यांना पत्र..
दरम्यान, निकम यांच्या चौकशीसाठी एका माजी नगरसेवकाने नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक अनावश्यक आणि खर्चिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गेल्या नऊ वर्षांत सुमारे ४० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली. त्यातील अनेक कामे दर्जाहीन असून काही प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की नाहीत, यावरही त्यांनी पत्रात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संगनमत करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रीन बॉण्ड आणि म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून शेकडो कोटी उभारण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला असून बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या, तसेच सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचे दायित्व निर्माण करण्यात आले आहे, असं त्या पत्रात नमूद आहे.








