- कचरापेट्या नाल्यात पडून, आरोग्य विभाग झोपेत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ मार्च २०२६) :-रावेत परिसरातील भोंडवे कॉर्नर समोरील नाल्यात सुका व ओला कचरा वर्गीकरणासाठी बसवण्यात आलेल्या लोखंडी कचरापेट्यांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. नागरिकांच्या स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या या कचरापेट्या सध्या धुळखात पडलेल्या असून काही उलटलेल्या अवस्थेत नाल्यात फेकल्या गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’च्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या डस्टबिन्सचा वापर न होता त्या दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. काही कचरापेट्यांचे झाकण तुटलेले असून लोखंडी सांगाडा उघडा पडला आहे, तर काही पूर्णपणे नाल्यात कोसळून गंज खात आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा विखुरलेला दिसत असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहर स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट असताना अशा प्रकारे कचरापेट्यांची दुर्दशा होणे ही प्रशासनासाठी लज्जास्पद बाब मानली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कचरापेट्यांची दुरुस्ती, पुनर्स्थापना आणि नियमित देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कचरापेट्या बसवल्यानंतर त्यांची नियमित साफसफाई आणि देखभाल होत नाही. त्यामुळे लोक कचरा रस्त्यावर टाकू लागले आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजनाचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
– मनोज नाईक, सोसायटीधारक (रावेत)…याबाबत सद्यस्थिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली असता तातडीने कचरा पेट्या एकत्रित करून त्या वापरायोग्य करण्याचं आश्वासन आरोग्य विभागाने दिलं आहे.
















